मराठी गझले - जयदीप जोशी




हे तळ्यांचे शहर.. एक नंबर!
आपले त्यात घर..एक नंबर!

 (ती... नदीसारखी नेस साडी..)
(तो धुक्याचा पदर.. एक नंबर!)

खूप पाऊस, ओला बिला मी
ती व नजरानजर..एक नंबर!

स्पर्श केलास तू, ताप गेला..
राहिलेली कसर... एक नंबर !

लागला हात होता चुकूनच..
बंद झाला गजर.. एक नंबर!

हट्ट इतका कशाला करावा
फार झाले. विसर ! एक नंबर..

·        

कोरडी, बेरंग संध्याकाळ ...... आणि मी
घेरते आहे मला आभाळ ....आणि मी

दूर गेले केवढे पक्षी उडत उडत
पोचली आहे कुठे ती माळ ... आणि मी

हा कुणाच्या मालकीचा डोह? सांग ना...
साठला आहे तळाशी गाळ आणि मी

मांडतो शब्दात मी, तू सांगतेस ते
केवढी आहेस तू वाचाळ... आणि मी?

वाटते आहे कसे ऎकून हे मला..?
आठवत आहे तुला तो काळ.. आणि मी.

·        

कशी ही उमलली प्रभावी फुले
उजेडात आली निनावी फुले

तुझे काय चुकले असावे असे?
कळ्यांना म्हणालास भावी फुले

पडूदेत ना, वाट बघ की जरा
कशाला अगोदर खुडावी फुले

सहल काढ, आतून बाहेर ये
त्वचेवर किती गोंदवावी फुले

वधारेल का सांग किंमत कधी
किती कागदाची करावी फुले

·        

सोडला होता किनारा एकदा
प्यायलेलो खूप वारा एकदा

पावसामध्ये कसा भिजणार मी
झाडल्या होत्यास गारा एकदा

त्या कहाणीने किती छळले मला
पाहिलेला वीर ज़ारा एकदा

एकदा नापास झाले आतले
काढला होता पहारा एकदा

राहिली नाही मजा शब्दांमधे
वाच की माझा शहारा एकदा

·        

त्रास देतो मला, काय सांगू तुला!
हा विषय आपला.. काय सांगू तुला!

येत नाही स्वतःला कधी सांगता
काय झाले मला? काय सांगू तुला..

मिट्ट काळोख स्वप्नातही पोचतो
का दिवा लावला? काय सांगू तुला

एवढे स्वस्त नसतेच कोमेजणे
कागदाच्या फुला .. काय सांगू तुला

काय हातात होते असे राहिले
हात का कापला ? काय सांगू तुला!

वेगळे चित्र होते अपेक्षित मला
पाय का काढला? काय सांगू तुला?

·        

चर्या ती इतकी कशी बदलते माहीत नाही मला
बागेतील हवेत काय असते? माहीत नाही मला

एकांतात रडून पोट भरते? माहीत नाही मला.
हा पाऊस विकून काय मिळते ? माहीत नाही मला

आल्या एकच पीक घेत बहुधा मागील काही पिढ्या
ह्या मातीत अजून काय पिकते? माहीत नाही मला

डोळे बंद करून चाचपडतो अंदाज बांधायला
काळोखात बघून काय दिसते? माहीत नाही मला!

अस्ताव्यस्त करू नकोस जग हे देवातल्या माणसा
देव्हाऱ्यात बसून काय सलते? माहीत नाही मला!

·        

अडून बसतो अनुभव एखादा
सवय बदलतो अनुभव एखादा

धडा शिकवतो अनुभव एखादा
कवी बनवतो अनुभव एखादा

उजाड जमिनीवर मोठा होतो
दुरून दिसतो अनुभव एखादा

मनात असतो खजिना पुरलेला
तिथेच खणतो अनुभव एखादा

हवा बदलते काया पालटते
कुरूप बनतो अनुभव एखादा

·        

किती उपयुक्त आहे माहिती नाही
कुणाचे रक्त आहे ? माहिती नाही !

तुझ्याशी भांडतो, देतो शिव्यासुद्धा
तुझा तो भक्त आहे ! माहिती नाही?

असे दिसते तुला हे जग विखुरलेले
तसे संयुक्त आहे, माहिती नाही?

जुने अंगण जसे होते तसे आहे
कुठे प्राजक्त आहे? माहिती नाही.

तुझ्या डोळ्यात बघतो आणि जाणवते
किती अव्यक्त आहे माहिती नाही

·        

एवढी का मदार वाऱ्यावर
ठेवतो बर्फ मी निखाऱ्यावर

मित्र आहेत ना पहाऱ्यावर
ठेव ताबा तुझ्या शहाऱ्यावर

कोण वाहून चालले आहे
कोण होते उभे किनाऱ्यावर

हे घरी पोचल्याक्षणी होते
लक्ष जाते तुझे पसाऱ्यावर

राजहंसाकडे कुठे आहे
भाळते विश्व हे पिसाऱ्यावर

·        

राहिले काय सांगण्याजोगे
बोललो काय टाळण्याजोगे

शोधले गावभर, दिसत नाही
एक हाॅटेल राहण्याजोगे

काय हातात राहिले आहे
काय टोपीत काढण्याजोगे

सूर मारून पाहिला, कळले
डोह असतात डुंबण्याजोगे

दूर आलास हे बरे, झाले..
चित्र डोळ्यात मावण्याजोगे


:- जयदीप जोशी 

मराठी गझले - गोविन्द नाईक

Image may contain: 1 person


करू नावासवे कुठल्या तुझी सुरुवात आयुष्या
कुठे कळली तुझी अद्याप मजला जात आयुष्या

तुझे आयुष्य आहे तेवढे आयुष्य माझेही
मला पाहू नको केव्हाच तू पाण्यात आयुष्या

किती वर्षात नाही घेतले मांडीवरी तुजला
पुन्हा येशील का रे एकदा लाडात आयुष्या

तुझा रस्ताच होता वेगळा रस्त्याहुनी माझ्या
कसा झाला तुझ्या माझ्यात हा अपघात आयुष्या

तुला आयुष्यभर पुरतील एकांतात उधळाया
जमा केलेत इतके क्षण तुझ्या खात्यात आयुष्या

तुलाही पाहिजे मी अन तिलाही पाहिजे आहे
मला वाटून घ्या रे एकदा दोघात आयुष्या

तुला सोडून माघारी पुढे मी चाललो आहे
बरोबर न्यायची नाही तुझी औकात आयुष्या

·        

दिशा कुठे शब्दात जमावासाठी होती
भाषणबाजी केवळ नावासाठी होती

पत्राचा मजकूर विनंतीने भरलेला
पण शेवटची ओळ दबावासाठी होती

एक भाकरी दिसली अन घोषणा थांबल्या
पिचलेली माणसे उठावासाठी होती

एकमताने अखेर काही घडले नाही
दोन्हीकडची मते ठरावासाठी होती

घडायचे ते घडून गेले दिवसाढवळ्या
पुढली अख्खी रात्र तणावासाठी होती

भिस्त ठेवली नव्हती केवळ चिलखतावरी
वाघनखे हातात बचावासाठी होती

वर्मावर खंजीर लागला तेव्हा कळले
पाठीवरची थाप सरावासाठी होती

·        

दर्शनाविन संपली प्रत्येक वारी
विठ्ठला झालास तू कोठे फरारी

दूरवर आहे उभी अंधूक आशा
चालण्याची तेवढी आहे तयारी..?

शब्द बसला पाहिजे चपखल असा की
फेकतो पत्ता जसा अट्टल जुगारी

पाहुनी खांद्यांवरी भाते रिकामे
वाजण्याआधीच हरली ही तुतारी

पंख गरुडालाच होते शोभणारे
गांडुळाला झेपली नसती भरारी

पेरले होते दुहीचे बीज बहुधा
अन्यथा नसती फळे आली विषारी

घेतला नाही अजुन मी जन्म देवा
मांडतो आहेस तू कुठली उधारी..?

जेवढी लाचार होतिल माकडें ही
तेवढे इमले उभे करतिल मदारी

·        

खूप केल्या जगायच्या गोष्टी
मात्र गोष्टी ठरायच्या गोष्टी

जाग नव्हती तिच्या वसंताला
मीच केल्या फुलायच्या गोष्टी

दिवसभर त्या असायच्या कोठे
रात्रभर ज्या छळायच्या गोष्टी

आज कळतेय...काच ती होती
ज्यात मोठ्ठ्या दिसायच्या गोष्टी

जगताना कुशीत आईच्या
निज घेऊन यायच्या गोष्टी

मी मलाही महागलो होतो
स्वस्त जेव्हा मिळायच्या गोष्टी

शेवटी प्रश्न हाच होता की
काय घेऊन जायच्या गोष्टी ?

चंद्र तारे कुठून आणू मी
काय आहेत खायच्या गोष्टी ?

श्वास अद्याप संपला नाही
एवढ्यातच निघायच्या गोष्टी ?

·        

पारंब्यांच्या मनात आले..हात जरासे काढुन पाहू
जुन्या जाणत्या वडास एका क्षणात खाली पाडुन पाहू

ठराव करती दोन काजवे अंधाराच्या झाडावरती
सूर्य हरवला आता आपण प्रकाश थोडा वाटुन पाहू

किती चांदणे उधळशील तू आतुरलेल्या शेजेवरती
अवसेच्या रात्रीसाठीही चंद्र जरासा राखुन पाहू

रंगवलेल्या भिंतींवरुनी येइल का अंदाज घराचा
करार करण्याआधी आपण वासे दोन तपासुन पाहू

ब-याच दिवसांनी सुख आले.. भेटुन घेऊ त्यालाही पण
दूर चालल्या दु:खासाठी दोन आसवें ढाळुन पाहू

मला निरंतर भेटतोस तू श्वासांच्या अस्तित्वामधुनी
सांग विधात्या कशास तुजला दगडामध्ये कोरुन पाहू

·        

कधी सत्य पडताळले वावड्यांनी
म्हणे काठ ओलांडले खेकड्यांनी

भुकेने जरा आवरावे स्वतःला
किती पीळ सोसायचे आतड्यांनी

खुराड्यासही तोच उजळून देतो
जरी सूर्य नाकारला कोंबड्यांनी

तिचा गंध आधीच देईल वर्दी
उतावीळ होऊ नये चौघड्यांनी

दुरावा किती आतल्याआत होता
उजेडात जो आणला पोपड्यांनी

मनानेच अंदाज घ्यावा मनाचा
कधी प्रीत मोजू नये आकड्यांनी

पुन्हा वाट माझी सरळ होत आहे
मला हाक देऊ नये वाकड्यांनी

भरवसा कसा द्यायचा मापण्याचा
स्वतःला कुठे जोखले पारड्यांनी

मला जन्मतः दिव्य आले रडूही
मला बोल शिकवू नये बोबड्यांनी

·        

कधी सत्य पडताळले वावड्यांनी
म्हणे काठ ओलांडले खेकड्यांनी

भुकेने जरा आवरावे स्वतःला
किती पीळ सोसायचे आतड्यांनी

खुराड्यासही तोच उजळून देतो
जरी सूर्य नाकारला कोंबड्यांनी

तिचा गंध आधीच देईल वर्दी
उतावीळ होऊ नये चौघड्यांनी

दुरावा किती आतल्याआत होता
उजेडात जो आणला पोपड्यांनी

मनानेच अंदाज घ्यावा मनाचा
कधी प्रीत मोजू नये आकड्यांनी

पुन्हा वाट माझी सरळ होत आहे
मला हाक देऊ नये वाकड्यांनी

भरवसा कसा द्यायचा मापण्याचा
स्वतःला कुठे जोखले पारड्यांनी

मला जन्मतः दिव्य आले रडूही
मला बोल शिकवू नये बोबड्यांनी

·        

पौर्णिमेला भार आता वाहवेना
तू जरासे चांदणे माळून घे ना

होउ दे अश्रू पुन्हा ताजेतवाने
तेवढा दु:खास माझ्या वेळ दे ना

नारळाच्या आड यादी मागण्यांची
देवही फसला कसा काही कळेना

कोणत्या वृत्तात मांडू दुःख माझे
एकही मात्रा जिथे लागू पडेना

मी जरी केली तयारी पावलांची
नेमकी वस्तीच माझी आठवेना

थोरवी त्यानेच गावी पिंजऱ्याची
एकही आकाश ज्याला सोसवेना

:- गोविन्द नाईक