शहर असे स्फोटक बनलेले- दाद नको फिर्याद नको
म्हणे कालच्या पुतळ्यांनाही आता गांधीवाद नको
काळोखाच्या पलित्याने उजळून टाकुया गाभारा
अंतर्यामी मज मिणमिणत्या सूर्याची अवलाद नको..
रस्त्यावरच्या एखाद्या नागड्या मुलाला घास भरव
विवंचनेच्या शेरापुरती सुखवस्तु मज दाद नको ...
थेट भेटुया बागेमध्ये...
लाड करुन घे हवे तसे
वॉट्स अपमधुनी तेच इमोजी नावाचे वस्ताद नको
फक्त स्वत:वर दृढनिष्ठा असली की होते साध्य कला
ओ पी नय्यर कधी म्हणाले - लता हवी शमशाद नको !
वादळ अनुभवण्यासाठी मी स्वत:समोरच नग्न उभी
दर्यावर्दी होण्यासाठी लाटेशी संवाद नको ?
गझल-2
कसा भूकंप होता, शोधुया का....
ढिगातुन खेळणीही उकरुया का ?
तुझ्या मूर्तीत ओलावा नसावा
मुलामा सोलवटुनी पाहुया का....
कडी वाजून आली जाग तर उठ
तसा छोटा अलार्मच लावुया का....
घड्याळाची सुई जागीच हलते
चला मृत्यूस चावी देउया का ...
तसेही पाॅपकाॅर्नच खात बसलो
तिकीट फाडुन घरी चल परतुया का...
कुणी कुंडीतला कचरा उधळला
मनाच्या कस्पटांना वेचुया का..
जुनी... पण जिंदगीची
जीन्स आहे
नव्या शर्टाबरोबर घालुया का ...
लयाला चालली चवचाल दुनिया
सुमेरीयन नव्याने होवुया का ...
तिचे पोर्ट्रेट की ती न्यूड दिसते
स्वत:ची सभ्यता पडताळुया का
गझल- 3
जिथे आकाश आहे त्या तिथे होते सरोवर
अशी मी कोरडी नव्हते तुझी होण्या अगोदर....
जखम प्रत्येक हिरवीगार आहे पालवीगत
चढू नाही दिले वारूळ मीही सांत्वनावर...
जिथे भिडली नजर फूलपाखरू जन्मास येई
तुझ्या स्पर्शात आला रोकडा व्यवहार नंतर...
नभाला टांगलेल्या पाळण्यातच झोपते जग
जरी आकाशगंगा वर नभाच्याही नभावर...
नको माघार ! दुनिये वासना मोकाट कर तू..
तुझी आहे तशीही भिस्त कोठे संयमावर ?
गझल-4
अंधाराच्या फटीतुनी पणती भगभगते
काया थकलेल्या आईची तशीच दिसते
वारा नसतो तरी उगाचच पडदा हलतो....
वारा असतो तेव्हा खिडकी कुठे खडकते?
थकल्यावर तो गादीला हमखास बिलगतो
भिंतीवरल्या छायांशी ती सलगी करते...
हिरव्या पानांचे जग फांद्यांपुरते आहे..
वारा शिरता पाचोळ्यांचे विमान बनते!
अर्ध्यामुर्ध्या जन्मानेही बरे शिकवले
उरलेल्यातुन मिळेल का काही ते बघते!
गझल- 5
डोहाचे हिरवे पाणी निर्धोक समजणे योग्य नव्हे ...
माझ्यामध्ये माझे हे बिनधास्त उतरणे योग्य नव्हे...
पडशिल मरशिल अपघाताने इच्छेला सांगतो किती...
जसे लटकती ट्रेनमधे , माझ्यात लटकणे योग्य नव्हे
मंदिरातल्या मूर्तीहुनही जरी लाघवी रुप तिचे...
तिच्या चेह-यावर नजरेची फुले उधळणे योग्य नव्हे
फुलासारखे उचलुन घे अन् तिला स्पर्शु दे ऊर तुझा
नुसत्या शब्दांच्या चुपणीवर गझल पोसणे योग्य नव्हे
गुन्हे नको तर - मुलीस नाही मुलास ठणकावून पहा-
सातच्यापुढे गल्लीबोऴी तुझे भटकणे योग्य नव्हे
थकलेले आयुष्य म्हणाले मिसरुड फुटल्या जगण्याला
गिटार खांद्याला घेउन, शू-लेस बांधणे योग्य नव्हे....
गझल-6
कधी बहर ल्यावे, कधी घमघमावे
फुलासारखे सोहळे मज मिळावे
कधी गुप्त व्हावे.. कधी
सभ्य व्हावे...
मनातील चोरास सारेच ठावे ....
प्रसंगी भरारी कशी उंच घ्यावी ?
कसे ठेंगणे या नभाला करावे ?
जुन्या खोकला की दिवस आजचा हा
उबळ येत नाही तरी खाकरावे
तिने चार वेळा फिरवलाय फडका
तिला वाटते घर घरागत दिसावे
कुणीही दिसेना तरी किलबिले ते
रिकामेपणाने असे घर भरावे
गझल 7
शमा वगैरे बागेमध्ये लाव अता
मुशाय-यांतुन होऊ देत उठाव अता
श्वासाचे झुरके संपत आले बहुधा
नवे कुणी आयुष्या तू शिलगाव अता
भिंती तोडुन प्रशस्त घर झाले आहे
आत घरातच धाव धाव भरधाव अता
रंग काढला डागडुजी केली आहे
पहिल्यापेक्षा वधारेल बघ भाव अता
देव होवुनी स्वप्नामध्ये अभय दिले
काळ होवुनी मार निरंतर ताव अता
पोटापाण्यासाठी आहे शहर इथे
कवितेपुरता उरला आहे गाव अता
गझल -8
जर कुणाची चाकरी करणार नाही
तो जिथे आहे तिथे दिसणार नाही ...
नग्नता निर्ढावली आहे जगी या
पारदर्शकता इथे रुचणार नाही
दार,खिडक्या,
उंबरे ठेवू हवे तर
भिंत दोघांच्यामधे असणार नाही
उतर वस्त्रे बेशरम हो आज दुनिये
झाकली लज्जा इथे खपणार नाही...
संशयाची मारली पाचर अशी की
मी स्वत:शीही कधी जुळणार नाही ...
गझल- 9
रिचवली आहे त्सुनामी वेदनांची..
रात्र की सारा शगुफ्ता तू व्यथांची ...
धूळ का तू फेकसी डोळ्यात देवा ?
आंधळी श्रद्धा तशीही माणसांची
चिवचिवाया एक चिमणीही न येते
व्यर्थ खिडकी पंचतारांकीत त्यांची...
संयमाचा उंबरा लावून घेऊ
काल वेटोळी मिळाली वासनांची
एक गल्ली रात्रभर उजळून निघते
थाटती जेथे दुकाने चांदण्यांची
प्रार्थनांचा वाढला आहे ढिगारा
स्वच्छता झाली कुठे आहे व्यथांची ...
गझल -10
राखेमध्ये दडलेला अंगार असावा
सणकी दिसणारा कोणी फनकार असावा...
डोळ्यांना दिसते ते निव्वळ सत्य नसावे
आभाळाला स्वत:चा आकार असावा
रानोमाळी एक उदासी भरली आहे
माझी लागण झालेला आजार असावा....
ज्योत जळाली पुरती पण 'तो' उजळत
नाही
पणती खाली लपलेला अंधार असावा..
काठावरती बसल्या बसल्या झोपी गेला
घरच्यापेक्षा वारा तेथे गार असावा
रोज खरडतो पब्लिश करतो इतक्या गजला
ऑफिसमध्ये बसण्याचाच पगार असावा
ज्याला पाहुन नतमस्तक होते ही दुनिया
तो माझ्या अंतस्थाचा विस्तार असावा
:- शिल्पा देशपांडे