21 जून 2017

मराठी गझले - जयदीप जोशी




हे तळ्यांचे शहर.. एक नंबर!
आपले त्यात घर..एक नंबर!

 (ती... नदीसारखी नेस साडी..)
(तो धुक्याचा पदर.. एक नंबर!)

खूप पाऊस, ओला बिला मी
ती व नजरानजर..एक नंबर!

स्पर्श केलास तू, ताप गेला..
राहिलेली कसर... एक नंबर !

लागला हात होता चुकूनच..
बंद झाला गजर.. एक नंबर!

हट्ट इतका कशाला करावा
फार झाले. विसर ! एक नंबर..

·        

कोरडी, बेरंग संध्याकाळ ...... आणि मी
घेरते आहे मला आभाळ ....आणि मी

दूर गेले केवढे पक्षी उडत उडत
पोचली आहे कुठे ती माळ ... आणि मी

हा कुणाच्या मालकीचा डोह? सांग ना...
साठला आहे तळाशी गाळ आणि मी

मांडतो शब्दात मी, तू सांगतेस ते
केवढी आहेस तू वाचाळ... आणि मी?

वाटते आहे कसे ऎकून हे मला..?
आठवत आहे तुला तो काळ.. आणि मी.

·        

कशी ही उमलली प्रभावी फुले
उजेडात आली निनावी फुले

तुझे काय चुकले असावे असे?
कळ्यांना म्हणालास भावी फुले

पडूदेत ना, वाट बघ की जरा
कशाला अगोदर खुडावी फुले

सहल काढ, आतून बाहेर ये
त्वचेवर किती गोंदवावी फुले

वधारेल का सांग किंमत कधी
किती कागदाची करावी फुले

·        

सोडला होता किनारा एकदा
प्यायलेलो खूप वारा एकदा

पावसामध्ये कसा भिजणार मी
झाडल्या होत्यास गारा एकदा

त्या कहाणीने किती छळले मला
पाहिलेला वीर ज़ारा एकदा

एकदा नापास झाले आतले
काढला होता पहारा एकदा

राहिली नाही मजा शब्दांमधे
वाच की माझा शहारा एकदा

·        

त्रास देतो मला, काय सांगू तुला!
हा विषय आपला.. काय सांगू तुला!

येत नाही स्वतःला कधी सांगता
काय झाले मला? काय सांगू तुला..

मिट्ट काळोख स्वप्नातही पोचतो
का दिवा लावला? काय सांगू तुला

एवढे स्वस्त नसतेच कोमेजणे
कागदाच्या फुला .. काय सांगू तुला

काय हातात होते असे राहिले
हात का कापला ? काय सांगू तुला!

वेगळे चित्र होते अपेक्षित मला
पाय का काढला? काय सांगू तुला?

·        

चर्या ती इतकी कशी बदलते माहीत नाही मला
बागेतील हवेत काय असते? माहीत नाही मला

एकांतात रडून पोट भरते? माहीत नाही मला.
हा पाऊस विकून काय मिळते ? माहीत नाही मला

आल्या एकच पीक घेत बहुधा मागील काही पिढ्या
ह्या मातीत अजून काय पिकते? माहीत नाही मला

डोळे बंद करून चाचपडतो अंदाज बांधायला
काळोखात बघून काय दिसते? माहीत नाही मला!

अस्ताव्यस्त करू नकोस जग हे देवातल्या माणसा
देव्हाऱ्यात बसून काय सलते? माहीत नाही मला!

·        

अडून बसतो अनुभव एखादा
सवय बदलतो अनुभव एखादा

धडा शिकवतो अनुभव एखादा
कवी बनवतो अनुभव एखादा

उजाड जमिनीवर मोठा होतो
दुरून दिसतो अनुभव एखादा

मनात असतो खजिना पुरलेला
तिथेच खणतो अनुभव एखादा

हवा बदलते काया पालटते
कुरूप बनतो अनुभव एखादा

·        

किती उपयुक्त आहे माहिती नाही
कुणाचे रक्त आहे ? माहिती नाही !

तुझ्याशी भांडतो, देतो शिव्यासुद्धा
तुझा तो भक्त आहे ! माहिती नाही?

असे दिसते तुला हे जग विखुरलेले
तसे संयुक्त आहे, माहिती नाही?

जुने अंगण जसे होते तसे आहे
कुठे प्राजक्त आहे? माहिती नाही.

तुझ्या डोळ्यात बघतो आणि जाणवते
किती अव्यक्त आहे माहिती नाही

·        

एवढी का मदार वाऱ्यावर
ठेवतो बर्फ मी निखाऱ्यावर

मित्र आहेत ना पहाऱ्यावर
ठेव ताबा तुझ्या शहाऱ्यावर

कोण वाहून चालले आहे
कोण होते उभे किनाऱ्यावर

हे घरी पोचल्याक्षणी होते
लक्ष जाते तुझे पसाऱ्यावर

राजहंसाकडे कुठे आहे
भाळते विश्व हे पिसाऱ्यावर

·        

राहिले काय सांगण्याजोगे
बोललो काय टाळण्याजोगे

शोधले गावभर, दिसत नाही
एक हाॅटेल राहण्याजोगे

काय हातात राहिले आहे
काय टोपीत काढण्याजोगे

सूर मारून पाहिला, कळले
डोह असतात डुंबण्याजोगे

दूर आलास हे बरे, झाले..
चित्र डोळ्यात मावण्याजोगे


:- जयदीप जोशी 

3 टिप्‍पणियां: