8 जून 2017

मराठी गझले – चन्द्रशेखर सानेकर

Image may contain: 1 person

1

टाकतो काळ मोहजाल किती
लोक फसतात आजकाल किती

हे नवे तांबडे की रक्त नवे ?
हा हवेच्या घरी गुलाल किती

भूक अन् शेत सवंगडी सच्चे
मात्र दोघांमधे दलाल किती

खून करतात जे जबाबांचे
तेच करती अता सवाल किती

घाम गाळा,नवे तरी शोधा !
तेच खोटे पुन्हा विकाल किती

सर्व सैतान भरजरी दिसती
देव झाले बघा बकाल किती

चोर म्हणती,तुला कशास हवे ?
देश म्हणतो,अरे लुटाल किती !

तो तुझा देव,यार की नियती ?
दु:ख करतो तुला बहाल किती


2

थेटच त्याला उराउरी भेटुन आला
एक चांदवा सुर्याशी बोलुन आला
तिने असे समजून घेतले त्याला, की
तो गेला अन् नुसता ओशाळुन आला
इथून इतका सुसाट धावत गेला, की
आभाळावर एक चित्र काढुन आला
सगळी त्याची कटकारस्थाने कळली
अता काय पण,कालच तो निवडुन आला
ती काही क्षण गॅलरीत येउन गेली
तेवढ्यात वारा पुरता झिंगुन आला
महासरोवर होते ते, आटुन गेले
जो जो गेला तो पाणी चाखुन आला
कळला त्याला रोख तिच्या उद्रेकाचा
गुपचुप गेला,पासवर्ड बदलुन आला
तीही त्याला तुटक तुटक वाचुन गेली
तोही वरवर तिला तसे चाळुन आला3

झिजून काडी झाले आहे मुसळ किती
कारस्थाने करते आहे उखळ किती
इथे तिथे करतात नद्या कुुजबूज अता
"होउ लागले समुद्र हल्ली उथळ किती !"
तुझ्या दिव्यांचा उजेड आहे प्रखर तरी
बघ माझा काळोख त्याहुनी उजळ किती !
खाण तुला सोन्याची सापडली आहे
निघेल बघ त्या सोन्यामधुनी पितळ किती !
किती भयंकर गुंता केसांचा झाला !
तुझा कंगवा झाला आहे विरळ किती
जीव जसा घुसमटू लागतो, हे कळते
आले आहे कोण आपल्या जवळ; किती़4

असे कुणीही नाही ज्याला इथे खास जागा नाही
हाय,तुझ्या या मैफलीमधे फक्त तुझा वेडा नाही !
उगाच नाही इथे मला अस्वस्थ खूप वाटत आहे
इथे तुझा वावर आहे तर ही माझी जागा नाही
याचे त्याचे कपडे पाहुन तो अपुली मापे घेतो
त्याच्यापाशी त्याच्या अंगाचा कुठला सदरा नाही
हळुहळू दृश्यांना पटले माझ्या दृष्टीचे म्हण्णे
(तरी बरे माझ्या नजरेवर कुठलाही चश्मा नाही)
कुठल्या गावाची ही वस्ती,सर्व घरे चुपचाप कशी ?
उनाड पोरांचाही येथे आसपास गलका नाही
खरेच मी ठेंगू आहे पण मान्य करत नाही कोणी
(म्हणजे माझ्या उंचीइतका इथे कुणी बुटका नाही)
तुला गवसण्याच्या ताणाने सैरभैर झालो होतो
फार चांगले झाले माझा तुझ्याकडे पत्ता नाही
एक तुझ्याशी भांडण झाले, दोन शेर लिहिले त्यावर
म्हणजे माझा दिवस तसा अगदीच फुकट गेला नाही5

अश्रूभरली कळशी घेउन गुमसुम ती बसली आहे
उदास झाले आहे पाणी, एक नदी दु:खी आहे
रात्र आज चालत आली तर धापा टाकत होती ती
जवळ घेतले तेव्हा कळले की ती पोटूशी आहे
कसे तुला मी सांगू मजला राग तुझा येतच नाही
राग तुझा आवडतो कारण शैली ओघवती आहे
अता तुझ्या सोबत आहे मी तरी तुझ्या सोबत नाही
( काय तुला मी सांगू माझी कुठे कुठे फितुरी आहे )
तिच्याच बाजूने भांडे मी तऱ्हेतऱ्हेने माझ्याशी
तरी तिला समजेना बाजू तिची खरी कुठली आहे
पुन्हा पुन्हा टिचकी मारुन ती नाद तोच एेकत असते
माझ्या कुजबुज शब्दांची कानात तिच्या बुगडी आहे
बांध तिच्या अश्रूंचा फुटला असे समजते आहे ती
कसे तिला सांगावे की ती तृष्णेने भिजली आहे
तिचा आरसा होण्याचाही तोच नेमका क्षण होता
एक काच बिंबाशी भांडत असताना फुटली आहे6

तोवरी आपापल्या तंद्रीत भटकू सारखे
भेटलो तर भेटूया की धूमकेतूसारखे
आजवर त्यांनी मनाची नोकरी केली अशी
राहिले त्यांच्यामधे काही न मेंदूसारखे
पाहतो आहे तमाशा हा कधीपासून मी
त्याच मुद्यावर कितींदा तेच बोलू सारखे
माणसाची भूक पाहुन देव थकुनी बोलला
" खायला इतके तुला कोठून आणू सारखे "
आपल्यातच असूनही सुनसान दिसते केवढे
हे तुझ्या-माझ्यात आहे काय टापूसारखे ?
हे अता माझ्या उरावर फूल फुलले कोणते ?
ते तुझ्या हातात होते काय चाकूसारखे ?
नजर दुनियेची तशी आधीच आहे तोकडी
जे न ती बघणार ते मी काय सांगू सारखे !
सारखा धुरळाच येथे पाहिला आयूष्यभर
सारखे फाडून डोळे काय पाहू सारखे ?7

सगळे काही गुंतागुंतीचे आहे
केवळ उपदेशापुरते सोपे आहे
अपुले तर सारे काही साधे आहे !
पण जे साधे आहे ते हटके आहे !
ठिगळे आता हाल हाल करतील तुझे
नको तिथे बघ भोक तुला पडले आहे !
फक्त एकट्या दु:खाचा बोजा नाही
सुख जे आहे त्याचेही ओझे आहे
नजरेवरती किती किती टाकू पडदे !
काय करू जर आरपार दिसते आहे !
विडी, चहा की जुगार खेळू एखादा ?
खिशात आता फक्त एक नाणे आहे
कळप बुडबुड्यांचा फिरतो आहे,सावध !
नशीब त्यांचे आजकाल मोठे आहे
ठार आंधळे निघून गेले फार पुढे
ज्याला दृष्टी आहे तो मागे आहे
कान फाटले शब्दांच्या उच्चारांनी
भाषेचे तर अंग अंग सुजले आहे
पाप आपले दिसले पण केविलवाणे
पुण्य पाहिले,तर तेही किरटे आहे8

सुट्टी आहे पण गर्दी बेफाट किती
चिडचिड करतो आहे गच्च फलाट किती
किती बुडबुड्यांची गर्दी झाली आहे
आभासांनी भरला आहे हाट किती
मौन नव्हे, ही हल्ल्याची रेकी आहे
मनात झुंडीच्या आहे घबराट किती
माती तहानलेली आहे केव्हाची
मेघ बरसतो आहे आटोकाट किती
तिचे दात अन् डंख,वीष शाश्वत आहे
फोडणार या दुनियेचे मुस्काट किती
तिच्यात कुठला फणकारा भरला त्याने ?
त्या खडकावर आदळते ती लाट किती
उत्तरआधूनिकता म्हणजे जीर्ण नवे
अनोळखी दिसते आहे मळवाट किती
पुढल्या शतकांच्या अंगावर पडलो मी
मला लागली होती ठेच विराट किती
सर्व डोंगरांच्या खिंडीतुन सुटलो,पण
कठीण होते सगळे पुढचे घाट किती
घर केव्हाचे दुखण्याने कण्हते आहे
घरातल्यांचा त्यात रोज गोंगाट किती9

कशास हे चांदणे एवढे चमकत असते ?
कुणास हे आभाळ एवढे मिरवत असते ?
दिवसा मी असतो चोथा निष्प्राण कुडीचा
एक पोकळी मला दिवसभर चघळत असते
खूप जवळच्या मोक्याला मी दिसतच नाही
मात्र दूरची संधी मजला निरखत असते
सांज मला वेचून आणते दिवसमळ्यातुन
रात्र मला जात्यात आपल्या भरडत असते
प्रेम तुझ्यावर करते दुनिया पण तेव्हा ती
शिकार करण्या आधी तुजला डिवचत असते
वेग नव्हे हा दुनियेचा, ही घाई आहे
ती जितके दाखवते त्याहुन लपवत असते
दिसे प्रवाहावरी धुक्याचा पडदा जेव्हा
नदी आपली चोळी तेव्हा बदलत असते
अव्याहत ही पानोपानी कुजबुज कसली ?
समाधीतही झाड कुणाशी बोलत असते ?
दिवस कधी नसतो माझा, मी त्याला परका
रात्र सखी माझी, ती माझे एेकत असते
कळे न मजला घेउन येते कोण कड्यावर 
कोण मला हे साद दरीतुन घालत असते ?
आभाळाचा तळ माझ्या माथ्याला टेके
म्हणून माझी चाल जरा मंदावत असते10

बनाव सगळा तयार झाला आहे
होकाराचा नकार झाला आहे
किती कंपने दिसू लागली माझी
तुझा चेहरा रडार झाला आहे
आभाळाचे ओझे कमाल होते
बुलंद डोंगर पठार झाला आहे
अहोरात्र अभ्यास करत होतो मी
मात्र मागचा हुशार झाला आहे
मचाण होते इतके कारस्थानी
तिथे शिकारी शिकार झाला आहे
हळवी हळवी सांज पाहिजे त्याला
स्वत: मात्र तो दुपार झाला आहे
मजला केवळ ढोल बडवता येतो
आणि काळ तर सतार झाला आहे
उन्ह केवढे प्रसन्न दिसते आहे
काय हवेचा पगार झाला आहे ?

~चंद्रशेखर सानेकर

 9820166243 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें