8 जून 2017

मराठी गझले - दत्त प्रसाद जोग

Image may contain: 1 person


1

जर हवे गाणे समेवर यायला
तू पुन्हा यावेस टाळी द्यायला

चल पडू बाहेर पुर्वीसारखे
हात मिसऱ्याचा धरुन हिंडायला

कल्पना शेफारली स्पर्शामुळे
लागले आहे कसेसे व्हायला

हा समज सन्मान जाळ्याचा तुझ्या
थांबलो थोडा तिथे गुंतायला

मी तुझी चर्चा मनाशी टाळतो ,.
आठवण देते कुठे विसरायला!!

नाव तो गल्लीतले सांभाळतो
तो अताशा दूर जातो प्यायला

काळजी माळ्यास नव्हती फारशी
ती सकाळी यायची चालायला

फक्त मी कंटाळलो हे बोललो
माणसे गेली सरण आणायला!!


2

वाटेने सावरले आहे...
हमरस्त्याने लुटले होते....

मिठीविना पर्यायच नव्हता
गात्र गात्र आसुसले होते!!

शब्द पुन्हा भिरभिरू लागले
दुःख नवे सापडले होते...

फक्त मुखवटे रडले मित्रा
आत चेहरे हसले होते....

तू जाताना हसलो होतो
(अश्रू मग ओघळले होते)

केवळ चर्चे पुरते उरले
खरे इथे जे लढले होते


3

जगण्यासाठी अवघड झाला
हा मोसमही भाकड झाला

वर्षभरातच बदली आली
सज्जन होता..बोजड झाला

उनाड होता तेव्हा लढला
घरटे विणले भेकड झाला

फक्त इगोचे लाड भोवले
जितका जपला वातड झाला

आधी नव्हता माणुस माकड
माणुस आता माकड झाला

मी दुःखांचा झालो श्रावण
जन्म अकारण कावड झाला....



4

दगडाना शेंदूर माणसे फासत गेली
माणसातला देव माणसे विसरत गेली,,,,

डुलकीच्या वेळीच फोन हा गावाकडचा
कळण्या आधी शिवी मुखातुन नकळत गेली,,,

घाट तुझा पाहून कडेने चालत गेलो...
नजर खोडकर वळणांवरती थबकत गेली,,,,

शब्दांनी तर भेग पाडली होती केवळ...
मौनाने ती दरी सारखी वाढत गेली!!

थकलेल्या बापाची झाली सही थरथरत
शिवार विकले,पोरे नोटा मोजत गेली,,,

वाटचाल  मी बघून ज्यांची शिकलो होतो
तीच माणसे गर्दीमध्ये मिसळत गेली,,,.

आज उन्हाला असेल बहुधा  कळला चटका
ऐन दुपारी ती अनवाणी चालत गेली....


5

तू मला चुकतेस दुनिये ओळखाया
वाकतो मुद्दाम ओळख दाखवाया

तिर्थयात्रा किर्तनांच्या सोड बाता
सांग लेका संपली का मोहमाया,...

लागली चाहूल पाठी भ्याड दैवा
ये पुन्हा तय्यार मी आघात घ्याया,...

सांग जा अब्रू जिची लुटली तिला हे...
' हर किसी इंन्सान में ईश्वर समाया,,,


6

घसरलो तर असो कोसळू दे मला
शिखर असते कसे ते कळू दे मला

वेळ आली न अद्याप चमकायची
काजव्या मग बघू!मावळू दे मला,,,!!

शोध माझा अथक बंद होईलही
(एकदा मी इथे आढळू दे मला...)

वेदने एवढ्यातच निघालिस कुठे?
घट्ट थोडी मिठी आवळू दे मला,...

तू नको शब्द कुठलाच बोलायला
ओठ हसता तुझे पाघळू दे मला,...

मी निवडले मशाली प्रमाणे जिणे
वाट गवसो तुला अन् जळू दे मला....!!


7

मला तर अवगतच नाही कला ही हात बघण्याची
कधी देऊन बघ सवलत तुझ्या डोळ्यात बघण्याची!!

हरवला तो म्हणावे की स्वतःला गवसला आहे ?
अचानक लागली त्याला सवय शुन्यात बघण्याची!

तळाशी खोल डोहाच्या मला जाण्यात आहे रस
तुझीही हौस भागव तू मला पाण्यात बघण्याची

अरे हरएक जातीचे तुझ्या आतच उभे श्वापद
गरज नाही तशी काही तुला रानात बघण्याची

जगावरची नजर थोडी हटवली योग्य केले मी
खरोखर वेळ होती ती स्वतःच्या आत बघण्याची..

मला कित्येक ढंगांचे रडाया लावले त्याने
किती ही हौस दैवाला गळ्याची जात बघण्याची,..


8

या जगा पासून अंतर योग्य राखत जायचे
शक्य तितक्या काळजांचे साद ऐकत जायचे,,..

एवढ्यासाठीच मी ही झिरपतो डबक्यातुनी
साचण्यापेक्षा बरे हे मुक्त वाहत जायचे..

नेमक्या नाजूक ओळी यायच्या हाती तुझ्या
सोड तू दिसताक्षणी काळीज वाचत जायचे!!

ती निघुन गेली तरीही यायची स्वप्नात ती
रोज मग पैंजण पहाटे मंद वाजत जायचे....

सांधतो जखमा दिवसभर नाद हा आहे खुळा
दांडगे रात्री व्यसन हे घाव उसवत जायचे

तू मला विटलास मग मी घेतली बदली इथे
सांग मी देवा तुला का परत शोधत जायचे!!

वेळ ना मिळतो विणाया वस्त्र कुठलेही नवे
फाडते नियती इथे ते फक्त टाचत जायचे


दत्तप्रसाद जोग

9403817943

1 टिप्पणी:

  1. अप्रतीम गझलांचा प्रासादिक अनुभव. नेमक्या नाजुक ओळी यायच्या हाती तुझ्या
    सोड तू दिसताक्षणी काळीज वाचत जायचे...सुंदर

    जवाब देंहटाएं